


“UPSC निकाल लागला, तेव्हा बिरुदेव ढोणे मेंढरं चारत होता…”
ही कुठली तरी सिनेमातली कल्पना वाटावी, पण ती आहे कोल्हापूर जिल्ह्यातील यमगे (ता. कागल) गावातील बिरुदेव सिद्धाप्पा ढोणे यांची सत्य कहाणी.
जिथं हातात पुस्तकापेक्षा हातात काठी अधिक असते, जिथं अभ्यासाच्या वह्या मेंढरांच्या राखणीत ओल्या होतात, तिथून बिरुदेवने UPSC परिक्षेत ५५१ रँक मिळवली आणि आयपीएस अधिकाऱ्यापर्यंतचा प्रवास पूर्ण केला.
घरात कुणीही शाळा पूर्ण केलेलं नाही, मोबाइल हरवला म्हणून पोलिस ठाण्यात गेलेल्या बिरुदेवची तक्रारही कोणी घेत नव्हती. पण त्याच तरुणाने आज देशातील सर्वोच्च सेवेत यश मिळवलं आहे.
ज्यांनी उंबरठा ओलांडताना चप्पलही नसायची, त्या पायांनी आता प्रशासकीय अधिकाराच्या पायऱ्या चढल्या आहेत. हे फक्त बिरुदेवचं यश नाही, तर गावागावच्या कुशीतल्या, रानातल्या प्रत्येक मेंढपाळाचं आणि कष्टकरी शेतकऱ्याचं स्वप्न पूर्ण झालं आहे.
बिरुदेवसारख्या तरुणांनी प्रशासनात यावं, गावच्या माणसांना न्याय मिळावा, त्यांचा आवाज बुलंद व्हावा, हीच सर्वांची अपेक्षा आहे.
