विषय हार्ड न्युज,श्रीनगर (प्रतिनिधी) – जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यामुळे निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीत महाराष्ट्रातील अनेक पर्यटक अडकले होते. या संकटात सापडलेल्या पर्यटकांच्या मदतीसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांनी स्वतः श्रीनगरमध्ये जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला.

श्रीनगर विमानतळाच्या जवळील कॅम्पमध्ये पोहोचून उपमुख्यमंत्री महोदयांनी अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांची प्रत्यक्ष भेट घेतली व संवाद साधला. याआधी काही पर्यटकांनी फोनवरून मदतीची मागणी केल्यानंतर त्यांनी त्वरित हालचाल करत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे स्वीय सहाय्यक अभिजीत दरेकर, उपजिल्हाप्रमुख राजेश कदम आणि मदत पथक घटनास्थळी पाठवले.
शिंदे साहेबांनी संकटात असलेल्या पर्यटकांना दिलासा देत लवकरात लवकर त्यांच्या सुरक्षित परतीची व्यवस्था केली जाईल, असे आश्वासन दिले. विशेष विमानाची सोय करून त्यांना सुखरूप महाराष्ट्रात परतवण्यासाठी सरकार सज्ज असल्याचेही त्यांनी सांगितले.
या मदतकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत पर्यटकांनी, “उपुख्यमंत्री शिंदे म्हणजे संकटसमयी धावून येणारा आपलाच माणूस,” अशी भावना व्यक्त करत मनापासून आभार मानले.