विषय हार्ड न्युज:पुणे जिल्ह्यातील पानशेतजवळच्या रुळे या छोट्याशा गावातील २२ वर्षीय शिवांश जागडे याने UPSC परीक्षेत देशात २६वा क्रमांक पटकावत IAS अधिकारी होण्याचा मान मिळवला आहे. विशेष म्हणजे, त्याने पहिल्याच प्रयत्नात हे अवघड स्वप्न सत्यात उतरवले आहे.
शिवांशचे वडील शेतकरी असून आई शिवणकाम करून संसार चालवतात. मोठी बहीण वकील आहे. घरच्या आर्थिक अडचणींवर मात करत, कुठल्याही क्लासची मदत न घेता केवळ स्वअभ्यासावर आधारित नियोजनबद्ध मेहनतीच्या जोरावर त्याने हे घवघवीत यश संपादन केले आहे.
त्याने दहावीपर्यंतचे शिक्षण डीएसके स्कूल धायरी, पुणे येथे तर बारावीचे शिक्षण एसपीआय, औरंगाबाद येथून पूर्ण केले. सुरुवातीला NDA परीक्षेची तयारी केली होती, परंतु त्यात यश न मिळाल्याने त्याने स्पर्धा परीक्षेकडे वळण्याचा निर्णय घेतला. समाजासाठी काहीतरी करण्याची ओढ आणि जबाबदारीची जाणीव यातूनच IAS अधिकारी होण्याचा निर्धार त्याने केला.
शिवांश सांगतो, “स्वप्न मोठं असावं, पण त्यामागे मेहनतीची तयारी हवी. कुठे राहतो यापेक्षा कसा लढतो हे महत्त्वाचं. नियोजनबद्ध अभ्यास आणि सातत्य ठेवलं तर कोणतीही परीक्षा जिंकता येते.”
त्याचे हे यश ग्रामीण भागातील तरुणांसाठी एक प्रकाशस्तंभ ठरले आहे. शेतकरी कुटुंबातून आलेल्या या तरुणाने दाखवून दिलंय की जिद्द, चिकाटी आणि समर्पण असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही!