विषय हार्ड न्युज,पुणे, २४ एप्रिल: पुणे-सातारा मार्गावरील काञज घाटात आज दुपारी एका भीषण अपघाताची घटना घडली. ट्रकचा ताबा सुटल्यामुळे वाहन सुमारे २०० फूट खोल दरीत कोसळले. या अपघातात चालक गंभीर जखमी झाला असून, अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत धाडसी बचावकार्य करत त्याचा थरारक जीव वाचवला.
दुपारी साधारणपणे चार वाजण्याच्या सुमारास काञज घाटात जुन्या बोगद्याजवळ एक ट्रक खोल दरीत कोसळल्याची माहिती अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षात मिळाली. या माहितीची गंभीर दखल घेत काञज येथून अग्निशमन वाहन आणि मुख्यालयातून एक विशेष रेस्क्यु व्हॅन घटनास्थळी रवाना करण्यात आली.

जवानांनी घटनास्थळी पोहोचून पाहिले असता, ‘अशोक लेलँड’ कंपनीचा ट्रक (क्र. एमएच १२ केपी १०७३) अंदाजे २०० फूट खोल दरीत उलटलेल्या अवस्थेत आढळून आला. नागरिकांच्या सांगण्यानुसार, ट्रकचा चालक आत अडकलेला असून तो जिवंत आहे, हे लक्षात घेत तातडीने बचाव मोहीम हाती घेण्यात आली.
सेफ्टी बेल्ट, रश्शी आणि इतर उपकरणांचा वापर करत जवानांनी दरीत उतरून चालकाशी संपर्क साधला. त्याला धीर देत सुरक्षितपणे वर आणण्यात आले. त्यानंतर १०८ रुग्णवाहिकेच्या सहाय्याने त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात हलविण्यात आले. जखमी चालकाचे नाव विकास रसाळ (वय ३२, रा. लातूर) असे असून, तो साताऱ्याकडून पुण्याकडे जात होता.
या थरारक आणि शिस्तबद्ध बचावकार्यात अग्निशमन अधिकारी प्रदीप खेडेकर यांच्या नेतृत्वाखाली तांडेल वसंत भिलारे, विजय गोसावी, वाहनचालक बंडू गोगावले, फायरमन उबेद शेख, किरण पाटील, अक्षय देवकर, मयुर काटे, प्रशांत कुंभार, केतन भोईर, मंगेश खंडाळे, अक्षय शिंदे, किशोर टकले आणि अन्वर शेख यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
सदर अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी घाटातील अरुंद वळण आणि वाहनाचा ताबा सुटणे ही प्राथमिक शक्यता वर्तवली जात आहे. स्थानिक पोलीस आणि वाहतूक विभाग अधिक तपास करत आहेत.