विषय हार्ड न्युज,पुणे – स्वारगेट ते खडकवासला मार्गावरील मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी विठ्ठलवाडी ते फनटाईम थिएटर दरम्यान उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. मात्र, लाईट यंत्रणेचे काही काम प्रलंबित असल्यामुळे पूल अद्याप सुरू करण्यात आलेला नाही. हे काम तातडीने पूर्ण करून पूल नागरिकांसाठी खुला करण्यात यावा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिकेकडे केली आहे.
महापालिकेचे उपायुक्त बी. एस. पृथ्वीराज यांनी सात दिवसांच्या आत उर्वरित काम पूर्ण करून पूल वाहतुकीसाठी खुला केला जाईल, असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.
या शिष्टमंडळात मनसेचे महाराष्ट्र राज्याचे सरचिटणीस गणेश सातपुते, खडकवासला मतदारसंघ अध्यक्ष विजय मते, चंदन कड पाटील, महेश महाले, माणिकबाग शाखाध्यक्ष अंगराज पिसे आणि धायरी शाखाध्यक्ष आकाश साळुंखे सहभागी होते.
हा पूल राजाराम पुल ते फनटाईम थिएटरदरम्यान असून, सिंहगड रस्ता आणि धायरी नांदेड,, किरकिटवाडी, खडकवासला परिसरातील नागरिकांना होणाऱ्या वाहतूक कोंडीचा मोठ्या प्रमाणावर त्रास कमी होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.