राज्य महिला आयोगाची पोलिस आयुक्तालयात बैठक.
विषय हार्ड न्युज, पुणे : दिनानाथ मंगेशकर रुग्णालय गर्भवती मृत्यू प्रकरणी राज्य महिला आयोगाने घेतलेली दखल आणि आरोग्य विभागाचा अहवाल सादर करण्यासाठी पुणे पोलीस आयुक्तालयामध्ये बैठक झाली. आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली.आरोग्य उपसंचालक व पोलिस आयुक्त या बैठकीला उपस्थित होते.
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे एका निरपराध गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याच्या घटनेचा शासनाच्या आरोग्य विभागाचा अहवाल महिला आयोगाला प्राप्त झाला आहे. रुग्णालयाने सदर महिलेच्या उपचारात दिरंगाई केल्याचे या अहवालात नमूद आहे.
भिसे कुटुंबियांच्या घरी जाऊन भेट देत चाकणकर यांनी कुटुंबीयांची बाजू ऐकून घेतली. त्यांनी दाखवलेल्या कागदपत्रांमध्ये रुग्णालय प्रशासनाने दहा लाख रुपये मागितल्याची लेखी नोंद आहे. दरम्यान, चार सदस्यीय समितीचा प्राथमिक अहवाल प्राप्त झाला असून, उर्वरित दोन अहवाल आज अपेक्षित आहेत. अंतिम अहवाल पूर्ण होताच रुग्णालयावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
चाकणकर यांनी सांगितले की रक्तस्राव होत असतानाही उपचार झाले नाहीत. ऑपरेशन थिएटरमध्ये नेताना दहा लाख रुपयांची मागणी करण्यात आली. सरकार आणि मंत्रालयातून फोन गेले, तरीही रुग्णालयाने मदतीस नकार दिला. अखेर, या महिलेस उपचारविना रुग्णालयातून बाहेर न्यावे लागले. यामध्ये केवळ वैद्यकीय दुर्लक्षच नाही, तर रुग्णालयाने रुग्णाची वैयक्तिक माहिती सोशल मीडियावर जाहीर करून वैद्यकीय गोपनीयतेचा भंग केला.
चाकणकर म्हणाल्या ”हा मृत्यू केवळ एका महिलेचा नाही, तो आपल्या व्यवस्थेतील अनास्थेचा आणि पैशांसाठी माणुसकी गमावलेल्या व्यवस्थेचा आहे. महिलांचा आरोग्य सेवा हा मूलभूत हक्क आहे. आणि त्या हक्कासाठी महिला आयोग कायमच तत्पर आहे .”
संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींना शिक्षा होईपर्यंत महिला आयोग भिसे कुटुंबियांसोबत सोबत उभा आहे असेही रुपाली चाकणकर म्हणाल्या.