


पटबंधारे विभागाची सकाळी कारवाई; शाळकरी मुलांच्या वस्तूंचा ढिगाऱ्याखाली गाडला गेला संसार….
विषय हार्ड न्युज,धायरी (प्रतिनिधी) १३नोव्हेंबर २०२५:
सिंहगड रोड परिसरातील वडगाव बुद्रुकमधील कर्नल कॉलनीलगतच्या गोसावी वस्तीत शुक्रवारी सकाळी पटबंधारे विभागाने अचानक कारवाई करत वीस झोपड्यांवर बुलडोझर फिरवले. काही क्षणातच चिमुकल्यांचे घर, शालेय बॅगा, पुस्तके, कपडे आणि भांडीकुंडी मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेली. या घटनेनंतर परिसरात महिलांचा आणि नागरिकांचा आक्रोश उसळला.
‘आमचं सगळं संपलं…’ – नागरिकांचा संताप
“कोणतीही पूर्वसूचना न देता घरं पाडली. आमच्याकडे आता ना छप्पर, ना अन्न,” असे दु:ख व्यक्त करत रहिवासी महिलांनी प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला. काही जणांनी लहान मुलांना घेऊन रस्त्यावर बसून न्याय मागितला.
चिमुकल्यांच्या शाळेच्या बॅगा आणि पुस्तकांचा चुराडा
शाळेत जाणाऱ्या अनेक मुलांच्या वह्या, पुस्तकं, गणवेश आणि शाळेच्या बॅगा बुलडोझरखाली चिरडल्या गेल्या. काही पालक रडत-रडत ढिगाऱ्यातून पुस्तकं गोळा करण्याचा प्रयत्न करत होते. या दृश्याने उपस्थितांचा हृदय पिळवटून निघाला.
प्रशासनाचा दावा
पटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेश फडके म्हणाले, “ही बांधकामे जलसंपदा विभागाच्या जमिनीवर अनधिकृतरीत्या उभी करण्यात आली होती. कायद्याप्रमाणे पाडकाम करण्यात आले. पुनर्वसनाबाबत स्थानिक प्रशासनाशी चर्चा सुरू आहे.”
गोरगरिबांचा वाली कोण?
या कारवाईनंतर नागरिकांच्या डोक्यावर पुन्हा छप्पर केव्हा येणार, हा प्रश्न उभा राहिला आहे. शासनाच्या यंत्रणांनी गोरगरिबांसाठी तातडीने निवारा, अन्न व शिक्षणाची सोय करणे गरजेचे असल्याचे सामाजिक कार्यकर्त्यांचे मत आहे. “कायद्याची अंमलबजावणी आवश्यक आहे, पण मानवी बाजूही तितकीच महत्त्वाची,” असा सूर स्थानिक नागरिकांमध्ये उमटला.
