तात्पुरता दर्जा, वाढीव वेतन, आणि सुविधा मिळणार; १ ऑगस्टपासून अंमलबजावणी.
विषय हार्ड न्युज,पणजी, २१ जुलै २०२५ – अनेक वर्षांपासून शासकीय यंत्रणेत कार्यरत असलेल्या रोजंदारी कर्मचाऱ्यांसाठी गोवा सरकारकडून ऐतिहासिक निर्णय जाहीर करण्यात आला आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या मासिक वेतनात तब्बल ५२ टक्क्यांनी वाढ करण्यास मान्यता देण्यात आली. या निर्णयामुळे सुमारे ३,००० कर्मचाऱ्यांना थेट लाभ होणार आहे.
राज्याच्या २०२५–२६ च्या अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आलेल्या ‘तात्पुरता दर्जा योजना’ अंतर्गत सात वर्षांहून अधिक सेवा बजावलेल्या रोजंदारी कर्मचाऱ्यांना आता तात्पुरता शासकीय दर्जा दिला जाणार आहे. त्यामुळे आता या कर्मचाऱ्यांना नियमित कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन, ईपीएफ, सशुल्क रजा यांसारख्या मूलभूत सुविधा प्राप्त होतील.
वेतनवाढ कशी असेल?
• अकुशल कामगार (सफाई कर्मचारी, मदतनीस, सुरक्षा रक्षक, एमटीएस) –
जुने वेतन: ₹12,818 → नवीन वेतन: ₹20,000 प्रतिमहा
• कुशल कामगार (चालक, विजतंत्रज्ञ, लिपिक, गवंडी, नळसंधारणकार) –
नवीन वेतन: ₹25,000 प्रतिमहा
या वेतनवाढीसोबतच, दरवर्षी ३% वाढीव भत्ता (Annual Increment) देण्यात येणार आहे. या सर्व सुधारणा १ ऑगस्ट २०२५पासून लागू करण्यात येणार आहेत.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, “शासकीय यंत्रणेत कठोर परिश्रम करणाऱ्या रोजंदारी कर्मचाऱ्यांचे योगदान अनमोल आहे. त्यांच्या सामाजिक व आर्थिक सुरक्षेसाठी गोवा सरकार कटिबद्ध आहे. हा निर्णय म्हणजे त्यांच्या निष्ठेचा गौरवच आहे.”