संखाळी शहराला ‘प्रॉमिसिंग स्वच्छ शहर’ पुरस्कार | राष्ट्रपतींच्या हस्ते दिला गौरव | स्वच्छ भारत अभियानातील गोव्याचा ऐतिहासिक टप्पा.
विषय हार्ड न्युज,नवी दिल्ली, १७ जुलै २०२५:
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत गोव्याने स्वच्छतेच्या दिशेने महत्त्वाची वाटचाल करत देशभरात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. स्वच्छ सर्वेक्षण 2024-25 मध्ये पणजी शहराने 20,000 ते 50,000 लोकसंख्या गटात “देशातील सर्वात स्वच्छ शहर” हा बहुमान पटकावला आहे, तर संखाळी शहराने “प्रॉमिसिंग स्वच्छ शहर” हा मानाचा पुरस्कार मिळवला आहे
हा गौरव राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते विज्ञान भवन, नवी दिल्ली येथे एका भव्य समारंभात प्रदान करण्यात आला. यावेळी संपूर्ण देशातील विविध राज्यांतील प्रतिनिधी, महापालिका अधिकारी व स्वच्छता दूत उपस्थित होते.
पणजी व संखाळीच्या या यशामागे स्थानिक स्वराज्य संस्थांचा सुसूत्र प्रयत्न, नागरिकांचा सक्रीय सहभाग आणि सफाई कर्मचाऱ्यांची सातत्यपूर्ण मेहनत आहे. केवळ पुरस्कार मिळवणे हेच उद्दिष्ट नसून स्वच्छ, सुंदर आणि शाश्वत शहर घडवण्याचा संकल्प या निमित्ताने अधिक दृढ झाला आहे.
या ऐतिहासिक यशाबद्दल गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी नागरिकांचे व सर्व सहभागी घटकांचे अभिनंदन करताना सांगितले, “हे यश प्रत्येक गोमंतकवासीयाचे आहे. स्वच्छ भारत हे केवळ अभियान नाही, ती एक राष्ट्रीय चळवळ आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणादायी नेतृत्वामुळे गोवा स्वच्छतेच्या दिशेने आदर्श ठरत आहे.”
स्वच्छतेतील या लक्षणीय कामगिरीमुळे गोवा इतर राज्यांसाठी प्रेरणास्थान ठरत असून, शाश्वत नागरी व्यवस्थेच्या दिशेने हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
