विषय हार्ड,न्युज,करंजे (भोर), १२ जुलै २०२५:
ग्रामीण जीवनाशी आपुलकी जपत आणि शेतीला सन्मान देत, सायबेज आशा ट्रस्टतर्फे भोर तालुक्यातील करंजे या दत्तक गावात भात लागवड उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमात ट्रस्टचे तब्बल ३० स्वयंसेवक उत्साहाने सहभागी झाले होते. त्यांनी श्री. ज्ञानेश्वर कुडले पाटील यांच्या १.५ एकर शेतजमिनीवर पारंपरिक पद्धतीने भाताची रोपे लावून प्रत्यक्ष शेतीकामात सहभाग घेतला.

या उपक्रमाचा मुख्य हेतू ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना श्रमबळ पुरवणे, शेतीप्रती सन्मान व्यक्त करणे आणि पर्यावरणपूरक शेतीपद्धतींना प्रोत्साहन देणे हा होता. शहरी पाश्र्वभूमीत वाढलेल्या युवकांनी चिखलात उतरून मातीच्या सुगंधात काम करण्याचा अनुभव घेतल्यामुळे त्यांच्यामध्ये शेतीविषयीचा आदर अधिक दृढ झाला.
सायबेज आशा ट्रस्ट हा भोर आणि वेल्हे (राजगड) तालुक्यांतील दत्तक गावांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत आहे. ट्रस्ट शिक्षण, आरोग्य, शेती आणि सक्षमीकरण या चार प्रमुख क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करत असून, भात लागवड, वृक्षारोपण, श्रमदान, गटार व रस्ते स्वच्छता, शाळा-अंगणवाडी दुरुस्ती यांसारख्या उपक्रमांच्या माध्यमातून ग्रामीण भागात शाश्वत परिवर्तन घडवून आणत आहे.
या भात लागवड उपक्रमामुळे ना फक्त शेतकऱ्यांना आधार मिळाला, तर स्वयंसेवकांनीही खऱ्या अर्थाने समाजसेवेचा अर्थ अनुभवला. हा उपक्रम म्हणजे शहरी तरुण आणि ग्रामीण माती यांच्यातील नाते घट्ट करणारा एक सशक्त सेतू ठरला आहे.