मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते संमेलनास प्रारंभ; देशभरातून अधिकारी आणि तज्ज्ञ सहभागी.
विषय हार्ड न्युज,मिरामार, गोवा | ८ जुलै २०२५:
ग्रामीण विकास मंत्रालय, भारत सरकार आणि गोवा राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (GSRLM) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘अनुभूती’ – आर्थिक समावेशनावरील राष्ट्रीय संमेलनाचे उद्घाटन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. तीन दिवस चालणाऱ्या या संमेलनात संपूर्ण देशभरातून आलेले ग्रामीण विकास तज्ज्ञ, अधिकारी आणि योजनांच्या अंमलबजावणीशी संबंधित भागधारक सहभागी झाले आहेत.

उद्घाटनप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाचे कौतुक करत, महिला सक्षमीकरणासाठी राबविण्यात आलेल्या पीएम गरीब कल्याण योजना, उज्ज्वला योजना, नळ से जल, स्वच्छ भारत मिशन, पीएम आवास योजना, मुद्रा व स्वनिधी यांचा विशेष उल्लेख केला. “या योजनांनी ग्रामीण महिलांमध्ये नवउमेद निर्माण केली असून ‘३ कोटी लक्षपती दीदी’ घडवण्याचे उद्दिष्ट महिला उद्योजकतेच्या दिशेने मोठे पाऊल आहे,” असे मुख्यमंत्री म्हणाले.
गोवा राज्याच्या योगदानावर प्रकाश टाकताना मुख्यमंत्री म्हणाले की,
• राज्यात ३,२५० हून अधिक स्वयं-सहायता गट (SHG) कार्यरत आहेत,
• जे सुमारे ४८,००० महिलांपर्यंत पोहोचले आहेत,
• ₹३,६५३ कोटींचे क्रेडिट लिंकिंग पूर्ण झाले आहे,
• ४१,६०० महिला जनधन योजनेशी जोडल्या गेल्या आहेत,
• ५४० विमा सखी महिलांना प्रशिक्षण देण्यात आले आहे,
• आणि ३६ SHG मार्फत CSC केंद्रे सुरू आहेत.
“हे आकडे दाखवतात की महिलांचा सहभाग केवळ नाममात्र न राहता, ते स्थानिक विकासाचे नेतृत्व करत आहेत. बँकांकडून ९९% कर्जवसुली ही त्यांच्या प्रामाणिकतेची साक्ष आहे,” असे ते म्हणाले. सर्व गटांना क्रेडिट लिंक केल्यास राज्यात ₹९०० कोटींपेक्षा जास्तचे फिरते भांडवल उपलब्ध होऊ शकते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
‘स्वयंपूर्ण गोवा’ मिशनविषयी सांगताना मुख्यमंत्री म्हणाले, “प्रत्येक घरापर्यंत विकास पोहोचवणे, आत्मविश्वास आणि प्रतिष्ठा देणे हे राज्य शासनाचे ध्येय आहे.”
या उद्घाटन सत्रास खासदार (राज्यसभा) श्री सदानंद शेट तानावडे, ग्रामीण विकास विभागाचे सचिव श्री संजय गोयल (IAS), संयुक्त सचिव श्रीमती स्मृती शरण, उपसचिव डॉ. मोनिका, तसेच विविध राज्यांतील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
