तंत्रज्ञानाचा मंत्र, आदिवासी ज्ञानाचा सन्मान!
विषय हार्ड न्युज,पुणे,दि -२६:
“जगाला ज्यांचे ज्ञान दडवून ठेवले गेले, आज त्याच हातांनी ते ज्ञान जागतिक व्यासपीठावर झळकते आहे!” — अशी स्फूर्तिदायक टिप्पणी ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांनी केली.
गडचिरोलीच्या घनदाट जंगलातून आदिवासी तरुणांनी व्हॉट्सअॅप व गुगल लेन्सच्या मदतीने दुर्मीळ वनस्पतींची माहिती संकलित करत नव्या युगात प्रवेश केला आहे.
“शास्त्रज्ञ थांबले, तंत्रज्ञान धावले!”
अनेक वर्षे आदिवासी समाजाला जंगलातील समृद्ध जैवविविधतेचे ज्ञान होते, पण शास्त्रीय चौकटीत ते कोणीही बांधून दिले नव्हते. शास्त्रज्ञांनी उच्चभ्रू मानसिकतेने आपले ज्ञान आदिवासींना दिले नाही. मात्र, काळ बदलला!
गुगल लेन्ससारख्या अॅप्समुळे आदिवासी तरुणांनी वनस्पतींची छायाचित्रे घेतली आणि काही क्षणांत माहिती मिळवली. अज्ञानाचा जो अडसर होता, तो आता तंत्रज्ञानाने दूर झाला. त्यामुळे “शास्त्रज्ञांच्या मदतीशिवायही प्रगती शक्य आहे” हे चित्र गडचिरोलीच्या मातीने दाखवले.
‘सामूहिक वनहक्कप्राप्त क्षेत्रासाठी वन संरक्षण व व्यवस्थापन कार्ययोजना’चा प्रकाशन सोहळा
वनराई संस्थेत झालेल्या या सोहळ्यात ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ डॉ. माधव गाडगीळ आणि सेवानिवृत्त प्राचार्य डॉ. विजय एदलाबादकर लिखित पुस्तकाचे प्रकाशन माजी खासदार प्रदीप रावत यांच्या शुभहस्ते झाले.
यावेळी आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था आयुक्त समीर कुर्तकोटी, सामाजिक कार्यकर्ते चैत्राम पवार, सदुराम मडावी, वनराईचे विश्वस्त सागर धारिया, धन्यकुमार चोरडिया आणि सचिव अमित वाडेकर प्रमुख उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन डॉ. प्राची क्षीरसागर यांनी केले, तर प्रास्ताविक अमित वाडेकर यांनी आणि आभार प्रदर्शन रोहिदास मोरे यांनी केले.
“ज्ञानाचा झरा आता थेट त्यांच्या हातात” — डॉ. गाडगीळ
“अनुभवजन्य ज्ञान आदिवासींना लाभले होते. मात्र, शास्त्रीय शिकवण देण्याची जबाबदारी कोणीच घेतली नाही,” अशी खंत डॉ. गाडगीळ यांनी व्यक्त केली.
ते पुढे म्हणाले, “जीवशास्त्र, वनस्पतीशास्त्रासारख्या अभ्यासक्रमांची गरज होती. आम्ही त्यांच्या ज्ञानाला चौकटीत बांधले आणि आज तंत्रज्ञानामुळे कोणतीही अडचण उरलेली नाही. इंग्रजी भाषा अडथळा वाटते खरे, पण सगळं ज्ञान फक्त इंग्रजीत नाही. नव्या साधनांनी ज्ञान अधिक सर्वसमावेशक होत आहे.”
- आदिवासींचा अनुभव+तंत्रज्ञान = नवीन ज्ञानक्रांती!
- गुगल लेन्समुळे दुर्मीळ वनस्पती जगाच्या नकाशावर.
“ज्ञानभाषेचा अभाव आणि ‘नोइज’ची भर” — माजी खासदार प्रदीप रावत
माजी खासदार प्रदीप रावत यांनी भाषेच्या विषयाला हात घालून नव्या दिशेने विचार मांडले.
ते म्हणाले, “आज लहान मुलांना ज्ञानापेक्षा गोंगाट (नोइज) अधिक मिळतो आहे. भावना व्यक्त करण्यासाठी मातृभाषा अत्यावश्यक आहे. जगभरातील ज्ञान स्थानिक भाषांमध्ये आणण्यासाठी एआय आणि गुगलसारख्या तंत्रज्ञानाचा उपयोग होईल, अशी सकारात्मक सुरुवात झाली आहे.”
त्यांनी आपल्या यशस्वी ‘निर्मल वारी’ योजनेच्या प्रेरणादायी कहाण्या सांगत कार्यक्रमाला विशेष रंगत दिली.