विषय हार्ड न्युज, पुणे:-राज्यातील लाखो विद्यार्थ्यांचे शिक्षण अधिक चांगले व्हावे, त्यांना आवश्यक त्या सुविधा मिळाव्यात आणि शाळांमधील अडचणी सरकारपर्यंत वेळेवर पोहोचाव्यात यासाठी राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
आता राज्यातील सर्व शाळांची व अंगणवाडी केंद्रांची माहिती ‘महास्कूल GIS’ या मोबाईल अॅपमध्ये संकलित केली जाणार आहे. यात शाळेचे नाव, इमारत, किचन शेड, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह यासारख्या गोष्टींचे फोटो व माहिती अपलोड केली जाणार आहे.

३० एप्रिलपर्यंत सर्व शाळांना ही माहिती अपलोड करणं बंधनकारक करण्यात आलं आहे. शाळांचे मुख्याध्यापक स्वतः शाळेच्या आवारातून फोटो काढून ही माहिती भरणार आहेत.
या प्रक्रियेमुळे राज्य सरकारला कुठल्या शाळेत काय सुविधा आहेत, कुठे नाहीत, हे लगेच कळेल. त्यामुळे भविष्यात शाळांसाठी जास्त चांगल्या योजना आखता येतील, गरज असलेल्या ठिकाणी सुविधांचा विकास करता येईल.
शाळांना आपला युडायस (UDISE) कोड किंवा युडायस प्लसमध्ये दिलेला मोबाइल क्रमांक वापरून अॅपमध्ये लॉगिन करावे लागणार आहे. त्यानंतर त्या शाळेची आधीपासून भरलेली माहिती अॅपमध्ये दिसेल आणि ती अद्ययावत करता येईल.
शासनाने हे अॅप तयार करून शैक्षणिक क्षेत्राला अधिक पारदर्शक, योजनाबद्ध आणि उत्तरदायी बनवण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे पालकांनाही त्यांच्या मुलांच्या शाळेबाबतची माहिती मिळेल आणि ‘एका क्लिकवर शाळेची माहिती’ असा सोपा पर्याय उपलब्ध होईल.
राज्य सरकारचा हा निर्णय म्हणजे विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी अधिक चांगलं शिक्षण, चांगल्या सुविधा आणि शाळांचा डिजिटल चेहरा उलगडण्याची सुरुवात आहे.
