विषय हार्ड न्युज,पुणे, दि. २३: पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वायुवेग पथकाने मोटार वाहन कर आणि पर्यावरण कर थकवणाऱ्या वाहनांवर मोटार वाहन कायद्याअंतर्गत कारवाई करत अनेक वाहने अटकावून ठेवली आहेत. अशा वाहनांचे मालक, चालक किंवा वित्तसंस्था यांच्यासाठी ही शेवटची आणि अंतिम संधी असून, त्यांनी लवकरात लवकर कार्यालयाशी संपर्क साधून आपली वाहने तडजोड शुल्कासह सोडवून घ्यावीत, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी राहुल जाधव यांनी केले आहे.
या अंतर्गत एकूण १४८ अटकावलेली वाहने जाहीर लिलावासाठी निश्चित करण्यात आली आहेत. ही लिलाव प्रक्रिया ३० एप्रिल (बुधवार) आणि २ मे (शुक्रवार) २०२५ रोजी होणार आहे. संबंधित वाहन मालकांनी लिलावाच्या तारखेपूर्वी आपली थकबाकी रक्कम भरून वाहने मुक्त करून घ्यावीत, अन्यथा ती वाहने कायमची जप्त करून लिलाव करण्यात येणार आहेत.
वाहने कुठे पहावीत?
या लिलावासाठी निश्चित करण्यात आलेल्या वाहनांची यादी खालील ठिकाणी फलकांवर प्रसिद्ध करण्यात आली आहे:
- प्रादेशिक परिवहन कार्यालय, पिंपरी-चिंचवड, संत नगर, मोशी प्राधिकरण
- तळेगाव एस.टी. आगार
- राजगुरुनगर (खेड) एस.टी. आगार
ऑनलाईन माहिती व अर्ज प्रक्रिया:
या लिलावासंदर्भातील अधिक माहिती आणि अर्ज प्रक्रिया https://eauction.gov.in व www.mstcindia.co.in या संकेतस्थळांवर उपलब्ध आहे.
संपर्क:
संपर्कासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय, पिंपरी-चिंचवडच्या ०२०-२७२३२८२८ या दूरध्वनी क्रमांकावर त्वरित संपर्क साधावा.
महत्त्वाची सूचना:
लिलावाच्या नंतर कोणत्याही तडजोडीला किंवा मागणीला प्रतिसाद दिला जाणार नाही. त्यामुळे संबंधितांनी ही अंतिम संधी म्हणून गांभीर्याने घेऊन आवश्यक ती कारवाई तातडीने करावी, असेही कार्यालयातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.