धायरीत घंटानाद आंदोलन; कचरा प्रकल्प बंद करण्यासाठी नागरिक रस्त्यावर..
विषय हार्ड न्युज,पुणे: धायरी येथील बेनकर मळा परिसरात महापालिकेच्या वतीने उभारण्यात आलेला कचरा विलगीकरण प्रकल्प तत्काळ बंद करण्यात यावा, या मागणीसाठी गुरुवारी संतप्त नागरिकांनी रस्त्यावर उतरत घंटानाद आंदोलन छेडले. प्रकल्पामुळे परिसरात वाढलेली दुर्गंधी, डासांचा प्रादुर्भाव, दूषित पाणी आणि आरोग्यविषयक धोके यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. या पार्श्वभूमीवर प्रकल्प बंद होईपर्यंत संघर्ष सुरूच ठेवण्याचा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला.
या आंदोलनात महिलांची विशेषतः मोठ्या प्रमाणात उपस्थिती दिसून आली. आंदोलकांनी घंटानाद करत प्रशासनाचे लक्ष वेधले. यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, आम आदमी पक्षाचे पदाधिकारी तसेच विविध सोसायट्यांचे रहिवासी एकत्र आले होते.
राजकीय व सामाजिक नेतृत्व एकत्र
या आंदोलनात काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस श्रीरंग चव्हाण पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते राहुल पोकळे, आम आदमी पक्षाचे शहराध्यक्ष धनंजय बेनकर, तसेच नीलेश दमिष्टे, सनी रायकर, गंगाधर भडावळे, बापू पोकळे, सचिन बेनकर, तुषार पोकळे, सपना राऊत यांसह यश प्लेटिनम, साई श्रेया, शिवप्रभा, व्यंकटेश शार्विल या सोसायट्यांचे अनेक रहिवासी सहभागी झाले होते.
नियमबाह्य
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते राहुल पोकळे यांनी प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत सांगितले की, “मुंबई महापालिका अधिनियम कायद्यानुसार कोणताही कचरा विलगीकरण प्रकल्प लोकवस्तीपासून किमान ५०० मीटर अंतरावर असावा, असा स्पष्ट नियम आहे. मात्र, याकडे दुर्लक्ष करून महापालिकेने हा प्रकल्प दाट लोकवस्तीच्या मध्यभागी उभारला आहे. त्यामुळे आरोग्य आणि सुरक्षेचा गंभीर धोका निर्माण झाला आहे. प्रकल्प सुरू झाल्यापासून त्याठिकाणी सातत्याने भीषण आगी लागत आहेत. यामुळे परिसरातील नागरिक दहशतीत आहेत.”
प्रकल्पामुळे वाढते प्रदूषण आणि आग
स्थानिक नागरिक नीलेश दमिष्टे यांनी सांगितले की, “या प्रकल्पामुळे शेजारील नैसर्गिक ओढ्यांचे पाणी विषारी झाले आहे. प्रदूषण नियंत्रण महामंडळ याकडे दुर्लक्ष करत आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या भीषण आगीत संपूर्ण प्रकल्प जळून खाक झाला. तेव्हा कामगार सुदैवाने गावी गेले होते, त्यामुळे जीवितहानी झाली नाही. मात्र, ही घटना ठेकेदाराच्या बेफिकिरीचे द्योतक आहे.”
रोगराईचा विळखा, प्रशासनाचे दुर्लक्ष
“या कचरा प्रकल्पामुळे दुर्गंधी, डास, व दूषित पाण्यामुळे नागरिक आजारी पडत आहेत. घराचे दरवाजे-खिडक्या कायम बंद ठेवाव्या लागतात. विहिरी व बोअरवेलचे पाणीही वापरण्यायोग्य राहिले नाही. गेल्या चार-पाच वर्षांपासून तक्रारी करूनही प्रशासन दखल घेत नाही,” अशी भावना काँग्रेसचे श्रीरंग चव्हाण पाटील यांनी व्यक्त केली.
उद्यानाऐवजी कचरा प्रकल्प!
“महापालिकेने जी जागा उद्यानासाठी आरक्षित होती, तिथेच मध्यवस्तीत कचरा प्रकल्प उभारला. आता याच ठिकाणी वारंवार आग लागून दुर्घटना घडत आहेत. तरीसुद्धा प्रशासनाने ठेकेदाराला पुन्हा काम सुरू करण्याची परवानगी दिली, हे धक्कादायक आहे,” असा आरोप आम आदमी पक्षाचे धनंजय बेनकर यांनी केला.
या आंदोलनाचा पहिला टप्पा गुरुवारी पार पडला असून, नागरिकांनी यानंतर महापालिका कार्यालयासमोर निदर्शने करण्याचा इशारा दिला आहे. प्रशासनाने जर लवकरात लवकर निर्णय घेतला नाही, तर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला.