दीनानाथ रुग्णालयाला जाग; आता इमर्जन्सीमध्ये रुग्णांकडून डिपॉझिट न घेण्याचा निर्णय…
विषय हार्ड न्यूज, पुणे :एका महिलेच्या दुर्दैवी मृत्यूनंतर निर्माण झालेल्या संतापाच्या पार्श्वभूमीवर, दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने मोठा निर्णय घेतला आहे. रुग्णालयाच्या विश्वस्त मंडळ व व्यवस्थापनाने आत्मचिंतन करत इमर्जन्सी विभागातील धोरणात महत्त्वपूर्ण बदल केला आहे.
यापुढे रुग्णालयात इमर्जन्सी कक्षात दाखल होणाऱ्या कोणत्याही रुग्णांकडून, डिलिव्हरीसाठी येणाऱ्या महिलांकडून, तसेच बालरोग विभागात येणाऱ्या रुग्णांकडून डिपॉझिट रक्कम घेतली जाणार नाही, असा ठराव करण्यात आला आहे. आजपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे.
रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. धनंजय केळकर यांनी पत्राद्वारे ही माहिती दिली. त्यांनी काल घडलेल्या घटनेबद्दल तीव्र खेद व्यक्त करत, तो दीनानाथ रुग्णालयाच्या इतिहासातील एक अत्यंत दु:खद व सुन्न करणारा दिवस असल्याचं म्हटलं आहे.
डॉ. केळकर म्हणाले “घटनेतील सत्य शासकीय चौकशीद्वारे उघड होईलच, मात्र या निमित्ताने सुरू झालेला असंवेदनशीलतेचा वाद संपवण्याची ही सुरुवात आहे. नागरिकांनी आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी याची नोंद घ्यावी.”