पुणे, दि. २८ मार्च २०२५: माण (ता. मुळशी) येथे एका शेतातील गवताच्या आगीमुळे शुक्रवारी (दि. २८) सायंकाळी ५.२९ महापारेषणच्या पिरंगुट-हिंजवडी २२० केव्ही अतिउच्चदाब टॉवर लाइनमध्ये ट्रिपिंग आले. त्यामुळे हिंजवडीमधील २०० आयटी उद्योगांसह हिंजवडी, वाकड, माण, मारूंजी, कासारसाई, निरे दत्तवाडी व परिसरातील घरगुती, व्यावसायिक व इतर सुमारे ६६ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा ४६ मिनिटे बंद होता.
दरम्यान, याच २२० केव्ही अतिउच्चदाब टॉवर लाइनमध्ये रात्री ७ वाजताच्या सुमारास पुन्हा ट्रिपिंग आल्याने या सर्व परिसरात वीजपुरवठा बंद झाला आहे. वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी महापारेषणच्या वतीने युद्धपातळीवर प्रयत्न सुरु होते.
याबाबत माहिती अशी की, माण (ता. मुळशी) येथे एका शेतावरून गेलेल्या महापारेषणच्या २२० केव्ही अतिउच्चदाब टॉवर लाइनखाली गवत पेटवल्यामुळे या लाइनमध्ये आज सायंकाळी ५.२९ वाजता ट्रिपिंग आले. परिणामी महावितरणच्या पिंपरी व मुळशी विभागातील वीजयंत्रणेत १५२ मेगावॅटची तूट निर्माण झाली. यामुळे हिंजवडी फेज १ ते ३ मधील २०० आयटी उद्योग तसेच वाकड परिसर, माण, मारूंजी, कासारसाई, निरे दत्तवाडी व परिसरातील घरगुती, व्यावसायिक व इतर सुमारे ६६ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा सायंकाळी ६.१५ वाजेपर्यंत बंद होता. महापारेषणच्या वरिष्ठ अभियंत्यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन दुरुस्तीचे काम पूर्ण केले. मात्र रात्री सात वाजताच्या सुमारास पुन्हा या टॉवर लाइनमध्ये ट्रिपींग आल्याने वीजपुरवठा पुन्हा खंडित झाला होता.