पुणे, २७ मार्च २०२५: शिरुर तालुक्यातील मौजे वढु बु. येथे साजरी होणाऱ्या श्री छत्रपती संभाजी महाराज पुण्यतिथी निमित्त २८ मार्च रोजी रात्री 10 वाजल्यापासून ते २९ मार्च सकाळी 10 वाजेपर्यंत जड वाहतूक, माल वाहतूक (ट्रक, टेम्पो) आदी वाहनांच्या मार्गामध्ये बदल तसेच शंभू भक्तांच्या वाहनांना थांब्याच्या ठिकाणापुढे (स्टॉपेज पॉईंट) वाहने घेवून जाण्यास मनाई करण्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डूडी यांनी जारी केले आहेत.
शंभू भक्तांची वाहने वगळता कोरेगांव भीमा बाजूकडून येणारी व वढू बु. मार्गे चाकण किंवा पाबळला जाणारी अवजड वाहतूक कोरेगाव भीमा-सणसवाडी-शिक्रापूर गॅस फाटा-वाजेवाडी चौफुला मार्गे चाकण,पाबळ बाजूकडे जाईल. चाकण, पाबळ बाजूकडून येणारी व वढू.बु कोरेगाव भीमा मार्गे पुणे बाजूकडे जाणारी अवजड वाहतूक वाजेवाडी चौफुला- गॅस फाटा-शिक्रापूर- सणसवाडी-कोरेगाव भीमामार्गे पुणे बाजूकडे जाईल.
कोरेगाव भिमा बाजूकडून येणारी शंभू भक्तांची वाहने कोरेगाव भीमा-वढू मार्गावरील माहेर संस्थेजवळ असणाऱ्या स्टॉपेज पॉईटच्या पुढे जाणेस मनाई करण्यात येईल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.