मिनी बसला आग अन् दरवाजा झाला लॉक; पुण्यातील घटनेत चौघांचा होरपळून मृत्यू, सहा जखमी

0
5

पुण्यात मिनी बस जळीत प्रकरण: चालकानेच पगार कपातीच्या रागातून बस पेटवली; चार कर्मचाऱ्यांचा मृत्यू

पुण्यात बुधवारी घडलेल्या मिनी बस दुर्घटनेने संपूर्ण शहर हादरले. हिंजवडी येथील व्योम ग्राफिक्स या आयटी कंपनीच्या कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या बसला अचानक आग लागली. या आगीत चार कर्मचाऱ्यांचा होरपळून मृत्यू, तर सहा जण जखमी झाले. सुरुवातीला हा अपघात असल्याचे समजले, मात्र पोलीस तपासात धक्कादायक सत्य समोर आले – ही आग अपघाती नव्हती, तर बस चालकानेच पगार कपातीच्या रागातून पेटवली होती.

कसा रचला कट?

पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, बस चालक जनार्दन हंबर्डीकर याने कंपनीतील कर्मचाऱ्यांचा वाद आणि दिवाळीच्या काळात मालकाने पगार कापल्याच्या रागातून हा कट रचला.

आदल्या दिवशीच हंबर्डीकरने गाडीत बेंझिन केमिकल आणून ठेवले.

ड्रायव्हर सीटखाली केमिकलची बाटली लपवली.

टोनर पुसण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या चिंध्या मुद्दाम गाडीत साठवून ठेवल्या.

हिंजवडीजवळ आल्यावर त्याने काडीपेटीने चिंध्या पेटवल्या, ज्यामुळे केमिकलने पेट घेऊन आगीचा भडका उडाला.

काही कर्मचाऱ्यांना बाहेर पडता आले, पण चार जण आगीत अडकून होरपळले.

चार जणांचा दुर्दैवी मृत्यू

या आगीत सुभाष भोसले (42), शंकर शिंदे (60), गुरुदास लोकरे (40) आणि राजू चव्हाण (40) या चौघांचा जागीच मृत्यू झाला. सहा जण जखमी असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सीसीटीव्ही आणि पोलिस तपासातून उघडकीस आले सत्य

हा प्रकार सुरुवातीला अपघात वाटत होता, मात्र सीसीटीव्ही फुटेज आणि सखोल चौकशीतून हा घातपात असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.

या घटनेने संपूर्ण शहरात खळबळ माजली आहे, तर अशा गंभीर गुन्ह्याबाबत कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here