


विशाल भालेराव.
विषय हार्ड न्यूज -राज्यात जाहीर करण्यात आलेल्या तीन दिवसांच्या दुखवट्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितींच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या उर्वरित टप्प्यांच्या कार्यक्रमात बदल करण्यात आला आहे. त्यानुसार, पूर्वी ५ फेब्रुवारी २०२६ रोजी होणारे मतदान आता ७ फेब्रुवारी २०२६ रोजी घेण्यात येणार असून, मतमोजणीची तारीख ७ ऐवजी ९ फेब्रुवारी २०२६ अशी निश्चित करण्यात आली आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाने दिली.
राज्य निवडणूक आयोगाने या निवडणुकांचा कार्यक्रम १३ जानेवारी २०२६ रोजी जाहीर केला होता. त्यानुसार नामनिर्देशनपत्र दाखल करणे, नामनिर्देशनपत्र मागे घेणे, निवडणूक चिन्हांचे वाटप तसेच अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणे या सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत. सध्या मतदान, मतमोजणी आणि निवडून आलेल्या सदस्यांची नावे शासन राजपत्रात प्रसिद्ध करणे हे टप्पे शिल्लक आहेत.
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने या निवडणुकांसाठी ३१ जानेवारी २०२६ नंतर दोन आठवड्यांची मुदतवाढ दिली आहे. दुखवट्याचा कालावधी २८ ते ३० जानेवारी २०२६ असल्याने उर्वरित निवडणूक कार्यक्रमात आवश्यक बदल करण्यात आले असल्याचे आयोगाने स्पष्ट केले.
सुधारित कार्यक्रमानुसार ठळक बाबी :
३१ जानेवारी २०२६ : जिल्हाधिकारी सुधारित निवडणूक कार्यक्रमाची अधिकृत सूचना प्रसिद्ध करतील.
७ फेब्रुवारी २०२६ : सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान.
५ फेब्रुवारी २०२६, रात्री १०.०० : जाहीर प्रचाराची समाप्ती.
९ फेब्रुवारी २०२६, सकाळी १०.०० : मतमोजणी.
निकाल जाहीर झाल्यानंतर संबंधित ठिकाणची आदर्श आचारसंहिता संपुष्टात येईल.
११ फेब्रुवारी २०२६ पर्यंत निवडून आलेल्या सदस्यांची नावे शासन राजपत्रात प्रसिद्ध केली जाणार आहेत.
निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता आणि वेळापत्रकाचे पालन सुनिश्चित करण्यासाठी हा बदल करण्यात आल्याचे राज्य निवडणूक आयोगाने नमूद केले आहे.
