


विशाल भालेराव.
विषय हार्ड न्युज, पुणे – उरुळी कांचन पोलीस स्टेशन हद्दीत हुंड्याच्या कारणावरून विवाहितेला मानसिक व शारीरिक जाचहाट करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या गंभीर प्रकरणात पोलिसांनी पती व सासू यांना अटक केली आहे. या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली असून, हुंडाबळींच्या वाढत्या घटनांवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे.
उरुळी कांचन पोलीस स्टेशन गु.र.नं. २२/२०२६ अन्वये BNS कलम ८०, १०८, ८५, ८९, ३५२, ३५१(३), ११५(२), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी सौ. हेमलता बाळासाहेब मगर (रा. कडवस्ती, सोरतावाडी, ता. हवेली, जि. पुणे) यांच्या तक्रारीनुसार, त्यांची मुलगी दीप्ती रोहन चौधरी (वय ३०) हिने दिनांक २४/०१/२०२६ रोजी सायंकाळी ०७:३० वाजता आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.
तपासात असे निष्पन्न झाले आहे की, मयत दीप्ती हिला सासरकडून सातत्याने हुंड्याच्या मागणीसाठी व माहेरून पैसे आणण्याच्या दबावासाठी जाचहाट करण्यात येत होती. या त्रासाला कंटाळूनच तिने टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. याप्रकरणी पती रोहन कारभारी चौधरी, दीर रोहित कारभारी चौधरी, सासरा कारभारी चौधरी व सासू सुनिता कारभारी चौधरी यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
विशेष बाब म्हणजे, या प्रकरणातील आरोपी सासू सुनिता कारभारी चौधरी या सोरतापवाडी गावच्या विद्यमान सरपंच आहेत. घटनास्थळी पंचनामा करून फोटो व व्हिडिओग्राफी करण्यात आली असून, आवश्यक भौतिक पुरावे जप्त करण्यात आले आहेत.
पोलिसांनी पती रोहन कारभारी चौधरी (वय ३१) यास दिनांक २६/०१/२०२६ रोजी ००:०५ वा. अटक केली आहे. तसेच सासू सुनिता कारभारी चौधरी (वय ५८) यांना त्याच दिवशी १४:३२ वा. अटक करण्यात आली असून, मा. न्यायालयाने दोघांनाही दिनांक ३१/०१/२०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. उर्वरित आरोपींचा शोध घेण्यासाठी स्वतंत्र तपास पथके कार्यरत असून, अटक करण्याची प्रक्रिया तत्परतेने सुरू आहे.
या घटनेनंतर परिसरातील कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती पूर्णतः नियंत्रणात असून, तपास कायद्याच्या चौकटीत, गांभीर्याने व वेगाने सुरू असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
सदर कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. संदीपसिंह गिल्ल, मा. अपर पोलीस अधीक्षक (बारामती विभाग) श्री. गणेश बिरादार, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी (दौंड विभाग) श्री. बापुराव दडस यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक श्री. सचिन वांगडे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. ज्ञानेश्वर बाजगीरे करत आहेत.
हुंड्याच्या छळामुळे एका विवाहितेचा बळी गेल्याची ही घटना समाजाला हादरवून सोडणारी असून, अशा प्रवृत्तीविरोधात कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे.
