


विशाल भालेराव
विषय हार्ड न्युज, पुणे – सिंहगड दंत महाविद्यालय व रुग्णालय, वडगाव (बु.), पुणे येथील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अखेर टोकाची भूमिका घेत आज दिनांक २७ जानेवारी २०२६ पासून आमरण उपोषणास सुरुवात केली आहे. तब्बल ४७ महिन्यांची वेतन थकबाकी, काही कर्मचाऱ्यांची विनाकारण करण्यात आलेली वेतन कपात तसेच पगाराअभावी निर्माण झालेला तीव्र आर्थिक व मानसिक ताण यामुळे कर्मचारी अक्षरशः हवालदिल झाले आहेत.
कर्मचाऱ्यांनी याआधी २५ सप्टेंबरपासून काम बंद आंदोलन तसेच २२ जानेवारीपासून साखळी उपोषण केले होते. मात्र, वारंवार निवेदने देऊनही महाविद्यालय प्रशासन व संस्थेकडून कोणतीही सकारात्मक दखल घेतली गेली नसल्याने अखेर आज सकाळी १० वाजल्यापासून मागण्या मान्य होईपर्यंत आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे.
कर्मचाऱ्यांनी दिलेल्या निवेदनात स्पष्ट इशारा दिला आहे की, उपोषणादरम्यान कोणतीही अनुचित घटना किंवा जीवितहानी झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी महाविद्यालयाचे प्राचार्य तसेच संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. एम. एन. नवले यांची असेल.
याच ठिकाणी—जिथे याआधी काम बंद आंदोलन व साखळी उपोषण झाले—तेथेच हे आमरण उपोषण सुरू असून, आंदोलन काळात किमान पिण्याचे पाणी व स्वच्छतागृह या मूलभूत सुविधांची परवानगी देण्याची मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे.
वर्षानुवर्षे सेवा देऊनही वेतनापासून वंचित राहावे लागणे, ही गंभीर बाब असून, या आंदोलनामुळे शिक्षण क्षेत्रातील खासगी संस्थांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. प्रशासन यावर काय भूमिका घेते आणि कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे कधी लक्ष दिले जाते, याकडे आता संपूर्ण शिक्षण व सामाजिक वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

