


विशाल भालेराव.
विषय हार्ड न्युज,शिवापूर : शिवापूर गावची कन्या तन्वी निलेश शिंदे हिने आपल्या अपार मेहनतीच्या जोरावर शैक्षणिक क्षेत्रात घवघवीत यश संपादन करत गोल्ड मेडल पटकावले आहे. या उल्लेखनीय कामगिरीमुळे संपूर्ण शिवापूर गावाचा मान अभिमानाने उंचावला असून गावात आनंद आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
तन्वीने सातत्य, शिस्त आणि कठोर परिश्रमाच्या बळावर हे यश मिळवले आहे. तिच्या या सुवर्णयशामुळे केवळ कुटुंबाचेच नव्हे तर संपूर्ण गावाचे नाव उज्वल झाले आहे. विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी तन्वीचे यश प्रेरणादायी ठरत असून “परिश्रमाला यश निश्चित मिळते” हे तिने पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले आहे.
या गौरवपूर्ण यशाबद्दल शिवापूर ग्रामस्थांच्या वतीने तन्वी निलेश शिंदे हिचा जाहीर सत्कार करण्यात आला. या सत्कार सोहळ्याला ग्रामस्थ, युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक, शिक्षकवर्ग तसेच मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी तन्वीचे कौतुक करत तिच्या पुढील शैक्षणिक व व्यावसायिक वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव केला.
यावेळी ग्रामस्थांनी आपल्या भावना व्यक्त करत सांगितले की, “तन्वीने मिळवलेले हे यश शिवापूर गावासाठी अभिमानास्पद असून तिच्या कर्तृत्वामुळे गावातील अनेक विद्यार्थ्यांना नवी दिशा व प्रेरणा मिळेल.” यावेळी सरपंच मेघा दिघे, सविता धोंडे, संजय आण्णा, सतिश दिघे, राजेद्र सट्टे, तांगडे सर, उमेश दिघे इत्यादी उपस्थित होते.
तन्वी निलेश शिंदे हिच्या या सुवर्णयशामुळे शिवापूर गावाचे नाव राज्यपातळीवर उजळले असून तिच्या पुढील यशासाठी संपूर्ण गाव तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे.
