


विषय हार्ड न्युज,रांजणगाव एमआयडीसी :
रांजणगाव एमआयडीसी परिसरात कामगारांना रोडवर अडवून मोबाईल व रोकड लुटणाऱ्या टोळीचा पोलिसांनी अवघ्या दोन तासांत पर्दाफाश केला. या कारवाईत तीन आरोपींना अटक करून सहा मोबाईल फोन व गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल असा एकूण १ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
दि. १४ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास स्वामी समर्थ मंदिराजवळून पायी जाणाऱ्या कामगारास मोटारसायकलवर आलेल्या चोरट्यांनी अडवून शिवीगाळ व दमदाटी करत मोबाईल व ९ हजार रुपये रोख हिसकावून नेले होते. या प्रकरणी रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने घटनास्थळी भेट देऊन स्थानिकांकडून माहिती घेत तीन आरोपींना ताब्यात घेतले. चौकशीत आरोपींनी एमआयडीसी परिसरात अशा प्रकारचे आणखी गुन्हे केल्याची कबुली दिली. जप्त करण्यात आलेले मोबाईल फोन परत मिळाल्याने कामगारांनी समाधान व्यक्त केले आहे.
या यशस्वी कारवाईचे सर्वत्र कौतुक होत असून, परिसरातील गुन्हेगारीला आळा बसण्यास मदत होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

